कोरोना उपचारासाठी मनुष्यबळाची कमतरता !
हजारो बेड तयार ; उपचार करणार कोण ?
एक लाख रुपये पगार देऊनही मिळेनात डॉक्टर्स !
प्रशासनाची कोरोनासोबत आता निकराची झुंज सुरू आहे. अशा अटीतटीच्या युद्धात उपचार सामुग्री उपलब्ध होत असताना या साधनसामुग्रीचा वापर करणारे हातच कमी पडत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मनपाने विक्रमी वेळात बाराशे बेड तयार केले मात्र एक लाख रुपये महिना पगार देऊनही डॉक्टर मुलाखतीला आले नाहीत. आरोग्य विभागात सर्वत्र हीच परिस्थिती दिसून येते.
शहरात सध्या दररोज २०० हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान दहा ते पंधरा लोकांना क्वारान्टीन सेंटर मध्ये पाठवले जाते. इतक्या वेगाने ही भरती होत असताना मनपासह घाटी, जिल्हा रुग्णालयात उपचार करणारे मनुष्यबळ अपुरे पडत आहे.
मनपाने केले बाराशे बेड तयार !
दरम्यान, शहरात रुग्ण संख्या वाढत असल्याचे पाहताच मनपाने युद्धस्तरावर नवे १२०० बेड तयार केले आहेत. याच बरोबर येत्या काही दिवसात आणखी १०५० बेड तयार करण्याचे नियोजन आहे. त्याच बरोबर २०० व्हेंटिलेटर नव्याने सुसज्ज केले जात आहेत. शहरात सध्या ९०० हून अधिक लोक क्वारान्टीन सेंटरमध्ये आहेत. रोज शेकडोच्या संख्येने संशयित दाखल होत असताना नवे सेंटर बनवण्याचा प्रयत्न युद्ध स्तरावर होत आहे. उपचारासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि बेड तयार होत असताना मनुष्यबळाची सोय काय ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
घाटीत केवळ ४५८ बेड !
दरम्यान, शहरातील सर्वात मोठ्या शासकीय घाटी रुग्णालयात आतापर्यंत केवळ ४५८ भेट ची व्यवस्था होऊ शकली आहे. केवळ गंभीर रुग्णानाच दाखल करण्यात येत असल्याचे सांगत प्रशासनाने बेड ची संख्या वाढविण्याकडे दुर्लक्ष केले. आता रुग्ण संख्या वाढत असताना घाटी प्रशासन बेडची संख्या वाढवेल कधी असा सवाल उपस्थित होत आहे.
डॉक्टर भरतीला प्रतिसाद मिळेना !
मनपा प्रशासनाने एमबीबीएस डॉक्टर आणि फिजिशियन भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला प्रतिसाद मिळाला नाही. एमबीबीएस डॉक्टरसाठी एक लाख रुपये प्रति महिना तर जनरल फिजिशियनसाठी १ लाख २५ हजार रुपये प्रति महिना मानधन देऊ केले होते. मात्र एकही डॉक्टर मुलाखतीसाठी आले नाही. उपलब्ध मनुष्यबळावर काम सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाची गेल्या सहा महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे आता युद्धजन्य परिस्थितीत कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे . दोन आकड्यात रूग्ण दाखल होत असताना जेव्हढे मनुष्यबळ कार्यरत होते तेवढ्याच मनुष्यबळावर अधिकच्या कामाचा ताण येतो आहे.
खाजगी रुग्णालयातही मनुष्यबळाची कमतरता !दरम्यान, खासगी रुग्णालयांनी ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवावे, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. मात्र खासगी रुग्णालयातही मनुष्यबळाची कमतरता आहे. एमजीएम रुग्णालयाने आतापर्यंत २५० बेड उपलब्ध केले आहेत. अजूनही शंभर बेड तयार करण्यात येत आहेत. मात्र या बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना सेवा द्यावी कुणी ? कोरोना उपचारासाठी डॉक्टर्स, आणि इतर स्टाफ पुढे येत नाही, ही खरी अडचण आहे. कमलनयन बजाज रुग्णालयानेही बेडची संख्या ८० वर नेल्याचे समजते. धूत सह सिग्मा, अपेक्स या रुग्णालयांनीही बेडची संख्या वाढविण्याची तयारी केली आहे. मात्र उपचार करणारे मनुष्यबळ आणावे कुठून हा यक्षप्रश्न रुग्णालयासमोर आहे.
कोरोनावर उपचार नको रे बाबा !
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय यंत्रणेतील अनेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगून फ्रंटलाईनवर काम करण्यास नकार देत आहेत. आई वडील म्हातारे आहेत, मुले छोटी आहेत, अथवा स्वतःला डायबिटीस, दमा, हृदयविकार असे रोग असल्याचे सांगत काढता पाय घेत आहेत. खासगी रुग्णालयातही हीच परिस्थिती आहे. कोरोना वार्डात उपचार करण्यासाठी डॉक्टर्स, कर्मचारी चक्क नकार देत आहेत. अनेकांनी तर राजीनामे देण्याची धमकी प्रशासनाला दिली आहे. एकंदरीत कोरोनावर कृत्रिम साधन सामग्री उपलब्ध करण्याकडे प्रशासनाचा ओढा असताना उपचार करणारे तज्ज्ञ मनुष्यबळ आणणार कुठून ? हा गंभीर प्रश्न यंत्रणेला सतावत आहे.
'मनपाने जाहिरात प्रसिद्धी केली होती. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. रुग्ण संख्या वाढत असल्याने आता मनुष्यबळही वाढवावे लागणार आहे. त्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
- नीता पाडळकर, वैद्यकीय अधिकारी मनपा












